22 March 2021

शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन मालमत्ता कशी तयार करावी ??

(English Version)

गुंतवणूकीसाठी शेअर मार्केट हे खरोखर उत्तम परतावा देणारे आणि उच्च जोखीमचे क्षेत्र आहे. मी माझ्या बर्‍याच मित्रांसह (नकुल, योगेश, मनोज आणि इतर) शेअर मार्केटमध्ये दिर्घकालिन मालमत्ता तयार करण्याच्या कल्पनेवर चर्चा करीत होतो. एका म्हणीनुसार, मोठ्या गोष्टी एका रात्रीत तयार होत नाहीत, त्याचप्रमाणे मोठी मालमत्ता एका दिवसात किंवा अगदी अल्प कालावधीत तयार केली जाऊ शकत नाही. दीर्घकालीन मालमत्ता तयार करण्याचे बरेचे मार्ग आहेत, सगळ्यात जास्त वापरला जाणारा एक मार्ग म्हणजे घर/ जमिन/ दुकान (स्थावर मालमत्ता) विकत घेणे. माझ्या मते ते एक फार मोठे दायित्व आहे. आपण एकदा ते विकत घ्या आणि दीर्घ मुदतीसाठी खर्च करत रहा उदा, कर्जाचे हप्ते, नगरपालिकेचा मालमत्ता कर, मासिक देखभाल खर्च आणि नंतर बऱ्याच कालावधीनंतर ती मालमत्ता स्वतःच्या मालकीची होते. इतरही मार्ग आहेत जसे की छोटी रक्कम बऱ्याच मोठ्या कालावधीत गुंतवत रहा उदा म्युचुअल फंड, बॅंकेत आवर्ती ठेव (रिकरिंग डिपॉजीट). ह्या ब्लॉगमध्ये मी ह्या मार्गांवर काही भाष्य करु इच्छित नाही.


शेअर बाजारासारख्या उच्च-जोखमीच्या क्षेत्रात दिर्घकालिन मालमत्ता तयार करणे शक्य आहे काय?

आपण हुशारीने वागल्यास, होय हे शक्य आहे. त्यातही हे करण्याचे बरेच मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग खालील प्रमाणे मी सुचवू इच्छितो.

मी एशियन पेंट्सचे २५ शेअर्स प्रत्येकी १३७० रु. किमतीने मे २०१९ मध्ये विकत घेतले. डिसेंबर २०२० पर्यंत या शेअर्सची किंमत प्रत्येकी २७७० इतकी झाली. तस पाहिले तर ही वाढ १००% पेक्षा जास्त आहे. टीपः मी काही फार चांगला शेअर बाजारातील गुंतवणूकदार नाही. या कंपनीच्या धंद्याची मूलभूत माहिती असल्यामुळे आणि हे समभाग १ वर्षापेक्षा अधिक काळ धरून ठेवल्यामुळे मला हा परतावा मिळाला. माझे सर्वच समभाग काही इतका छान परतावा देत नाहीत.

डिसेंबर २०२० मध्ये मी प्रत्येकी २७०० या भावाने १३ समभाग (शेअर्स) विकले. त्यातून मला रु. ३५००० मिळाले. मे २०१९ मध्ये मी कर आणि दलालीची रक्कम धरुन एकुण रु. ३४४५० मध्ये २५ समभाग घेतले होते. आता माझ्याकाडे १२ शेअर्स उरले आहेत आणि खरतर त्यासाठी मी एकही रुपया भरलेला नाही. या पुढे १५-२० वर्षांसाठी हे १२ समभाग मी विकणारच नाही. हे समभाग एका मालमत्तेप्रमाणे कार्य करतील. यांची किंमत वाढतच जाईल असा अंदाज आहे.

जर एखाद्याने असे समभाग (शेअर्स) स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये गोळा करुन ठेवले तर १५-२० वर्षाच्या कालावधीत शेअर मार्केटमध्ये अशाप्रकारे दीर्घकालीन मालमत्ता निश्चितच तयार केली जाऊ शकते.


यावरील अधिक विचार

  1. काय मी त्या समभागांचा मागोवा घ्यायला पाहिजे?
    • शेअर बाजारासारख्या उच्च जोखमीच्या क्षेत्रात, स्टॉप-लॉस खूप महत्वाचे आहे. शेअर बाजार वाढतच जाईल पण हा समभाग वाढतोय की नाही हे पहाणे स्वतःचे काम आहे. गुंतवणूकीतून कधी बाहेर पडायचे हे देखील महत्वाचे आहे. शेअर बाजारात काहीही बंद डोळ्यांनी ठेवू नये. किंमतीचा मागोवा नक्किच करत रहावा. जर किंमत खाली पडली किंवा कंपनीची मूलभूत तत्त्वे नष्ट होत असतील तर समभाग विका आणि त्यातून बाहेर पडा. जरीही वर सांगितल्यानुसार मी काहीही रक्कम दिलेली नसेल तरीही किंमत कमी झाल्यास समभाग विकुन पैसे काढणे महत्वाचे आहे.
  2. समभाग विकण्यासाठी योग्य किंमत किती असायला हवी?
    • यासाठी कोणतेही एकच उत्तर नाही. जेव्हा आपल्याला स्वतःला वेळ योग्य वाटेल तेव्हा त्यातून बाहेर पडा. महागाईच्या दराने तुम्ही किंमत ठरवू शकता. तुम्ही १०० रुपायांचे समभाग २०२० मध्ये वरील पध्दतीने जमा केले होते. समजा ८% महागाईचा दर आहे. १० वर्षानंतर चक्रवाढ व्याजानुसार याची किंमत २१६ रुपये झाली पाहिजे. जर का समभागांची किंमत जास्त असेल तर विकु नका पण जर कमी असेल तर नक्कीच विचार करा. पणा हा निर्णय सर्वस्वी तुमचाच असला पाहिजे.